Wednesday, March 7, 2018

जगातली पहिली शिवजयंती...



महाराष्ट्राचे हृदयस्थान, स्फुर्तीस्थान, चैतन्य व बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 388 वी जयंती आपण यंदा 19 फेबु्रवारीला साजरी करत आहोत. या पार्श्‍वभूमीवर जगात पहिली शिवजयंती कोणी साजरी केली? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महाराजांवर पहिले पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्‍नाची उत्तरे म्हणजे शिवजयंतीमागील खरा इतिहास आहे. जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले होत आणि छत्रपती शिवरायांवर पहिले पुस्तक लिहिणारे देखील महात्मा फुलेच होत. मात्र खरा इतिहास दडपून षडयंत्री मनुवादी लेखक आणि इतिहासकारांनी इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास आमच्या माथी मारण्याचे काम होत आलेले आहे. आम्ही आतापर्यंत दुसर्‍याच्या डोक्याने चालत आलो, वागत आलो. पण डॉ. आ. साळुंके म्हणतात त्याप्रमाणे, आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल. बहुजनांची मुले आता इतिहास आणि विविध ग्रंथांची चिकित्सा करू लागले आहेत. संशोधन करू लागली आहेत. खरे काय आणि खोटे काय हे पुराव्यासह सिद्ध करू लागली आहेत. वाचू, लिहू आणि बोलू लागली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती महात्मा फुलेंनी रायगडावर साजरी केली. हे काहींना माहित झालेले आहे, तर काही अजूनही या माहितीपासून दूरच आहेत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांना तात्याही म्हणत. त्यांना शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून 1869 साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी महाराजांची अडगळीत, झाडाझुडपातील समाधी शोधून काढली. ही समाधी शोधण्यासाठी फुलेंना तीन दिवस लागले. वेली तोडून घाणेरी काढली. समाधी स्वच्छ केली. महाराजांच्या समाधीवर म. फुलेंनी फुले वाहून भक्तीभावाने अभिवादन केले. ही गोष्ट रायगडवाडीच्या ग्रामभटाला कळली तेव्हा या भटाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला, समाधीवरी फुले जोशाने लाथेने बाजूला सारली आणि म. फुलेंना म्हणाला, ङ्गअरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय राजा होता होय? म. फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. म. फुलेंना या भटाचा रागही आला आणि दुःखही वाटले. पण म. फुले यांनीच ही जगातील पहिली शिवजयंती साजरी केली. तेव्हांपासून महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा निर्माण झाली. पण मनुवादी ब्राह्मण लोक मात्र म्हणतात महाराजांची पहिली जयंती बाळ गंगाधर टिळकांनी केली. टिळकांचा जन्म 1859 चा आणि 1869 मध्ये म्हणे  त्यांनी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. मग सांगा-1869 म्हणजे टिळक असतील चौथी किंवा पाचवीला, मग एवढ्या लहान वयात त्यांनी कशी सुरु केली शिवजयंती? प्रसिद्ध इतिहास संशोधक, महात्मा फुलेंचे अभ्यासक विचारवंत प्रा. हरि नरके यांनी म. फुलेंनीच पहिली शिवजयंती साजरी केल्याचे संशोधन केलेले आहे.  तसेच महाराजांवर 1 जून 1869 रोजी पहिले पुस्तक महात्मा फुलेंनीच लिहीले. शिवरायांवर खूप चांगला पोवाडा लिहिला. या सगळ्यावरून एकच सिद्ध होते की शिवाजी महाराजांची जयंती टिळकांनी सुरु केली नाही तर ती महात्मा फुलेंनीच सुरु केली.1870 साली पुण्यासह संपूर्ण महाराराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली. पेशव्यांच्या समर्थकांना याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते. कारण म. फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात फार मोठी जागृती केली होती. शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय म्हणजे गणोत्सव! गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण पेशव्यांचे कैवारी बाळ गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा सार्वजनिक उत्सव सुरु केला. म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी 1893 साली गणोत्सव सुरु केला.
 याबाबत महाराष्ट्रातील तमाम मराठा, कुणबीसह बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार साळी, कोळी,  दलित, आदिवासी, जाती,जमाती अशा सगळ्या बहुजन समाजात जागृती निर्माण व्हायला हवी. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवारायांना आदर्श मानले, त्या महात्मा फुलेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले. ही वैचारिक गुंफन समग्र बहुजनांनी समजून घेतली तर जाती-पातीची मनामनातील जळमटे दूर होऊ शकतील.

-शिवाजी कांबळे, लातूर
मो. 8459789944

dainik yuva chhatrapati, latur
..................................................

Saturday, December 24, 2016

नवी उमेद

तृप्तीताई अंधारे ह्यांनी घेतलेले हे कौतुकास्पद निर्णय

 पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे ह्यांनी घेतलेले हे कौतुकास्पद निर्णय
सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि महापालिकेच्या शाळांकडे लोकांचा
पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. अशा शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण
मिळत नाही असा समज सर्वश्रूत झालेला दिसून येतो. शिवाय सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे कमीपणाचे, दरिद्रीपणाचे समजले जाते. त्यातूनच खाजगी शाळांकडे पालक-विद्यार्थी ह्यांचा कल वाढलेला दिसून येतो. पण लातूर पंचायतसमितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांनी हा जिल्हा परिषद शाळांबद्दलचा समज चुकीचा आणि खोटा असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.
शिक्षण क्षेत्रात सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. खाजगी शिक्षण
संस्था, खाजगी शाळा मोठ मोठी जाहिरातबाजी करून, विविध प्रकारची अमिषे
दाखवून विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन
देतात. केवळ विद्यार्थ्यांच्या संख्याबळावर शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवणे
 हाच एकमेव उद्देश बहुतांश खाजगी शाळांचा असतो. शिवाय कॉन्व्हेंट
संस्कृतीमुळे यात आणखीनच भर पडली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दारोदार
 फिरताना दिसतात. विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी वर्गतुकड्यांची संख्या
कमी होऊ नये म्हणून त्या परिसरात विद्यार्थ्यांची पळवा पळवी मोठ्या
प्रमाणात सुरू झालेली आहे
अशा परिस्थितीत लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने एक अनोखा उपक्रम राबवून हायटेक शाळा आणि आनंददायी शिक्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू केले. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांनी पुढाकार घेऊन या शाळांमध्ये विविध वैशिष्टयपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. एवढेच नाही तर या उपक्रमांची लातूर तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ मोठे होर्डींग्ज लावून जाहिरातही केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवतापूर्ण शिक्षणमिळत असून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने शाळा प्रवेशाची जाहीरात करणारी लातूर पंचायत समिती ही पहिलीच असावी.
‘केवळ करिअर नव्हे, माणूस घडविणाऱ्या आमच्या जिल्हा परिषद शाळा' असे या जाहिरातीचे शिर्षक आहे. तसेच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास... प्रगत
शिक्षण हाच आमचा ध्यास, असा उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेंच्या
शाळांमध्ये सर्वांसाठी मोफत शिक्षण, मोफत पाठ्य पुस्तके व स्वाध्याय
पुस्तिका, सकस पोषण आहार, मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,
इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, मोफत
आरोग्य तपासणी व सेवा, अनुभवी व समृद्ध शिक्षक वृंद, ई-लर्निंगद्वारे
शिक्षण आणि १०० टक्के गुणवतेची हमी, असे विविध सुविधा-सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल लातूर पंचायत समितीचे पर्यायाने
गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांचे सर्वत्र कौतूक केले जात
आहे.त्यांचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात चर्चेचा व कुतुहलाचा विषय बनला
आहे
                                                                                    - शिवाजी कांबळे

नवी उमेद

‘स्वाधार’मुळे अंध शिकले जगणं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातलं बुधोडा गाव. येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या स्वाधार केंद्रानं अंधांना प्रशिक्षण देत तिथेच स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं आहे. स्वाधारचं वेगळेपण म्हणजे अंधपणाचे भांडवल न करता सन्मानाने अर्थाजन करीत एकमेकांना आधार देत समूहजीवन जगतात. हरिश्चंद्र सुडे हे सर्वांचे पपा तर सविता सुडे या ममा. या दाम्पत्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अंधांना आधार आणि स्वाभिमानही दिला. सविता यांचं मागच्या वर्षी निधन झालं. पण त्यामुळे खचून न जाता हरिश्चंद्र सुडे स्वाधार सांभाळत आहेत. राष्ट्र सेवा दल, यदुनाथ थत्ते आणि दादा गुजर यांच्या संस्कारात हरिश्चंद्र सुडे वाढले. 

निलंगा तालुक्यात अंधांसाठी सुरू केलेला प्रकल्प नंतर त्यांनी बुधोडा येथे आणला. १९८७ ते ८८ दरम्यान सुडे यांनी आठ -दहा झोपड्या उभारून अंध प्रशिक्षण व अर्थाजनासह पुनर्वसन कामाला सुरूवात केली. संस्थेत राहून प्रशिक्षण घ्यावे आणि कमवावे, हीच काय ती इथल्या प्रवेशासाठी अट. इथे २५ हातमाग यंत्र आहेत. त्यावर सुंदर अशा सतरंज्या, गालिचे, शाळेसाठी लागणाऱ्या आसनपट्टया तयार होऊ लागल्या आहेत. आता जुन्या साड्यांपासून अत्यंत सुंदर व कलात्मक गालीचे, सतरंज्या विणण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. लातूर शहरातील मिनी मार्केटमध्ये एका गाळ्यात विक्रीकेंद्रही उघडलं आहे.
यातून अंधांना महिन्याकाठी तीन-साडेतीन हजार रुपयांपर्यंतची मिळकत येते. शिवाय अंध व्यक्तींना अॅतक्युप्रेशर मसाज करण्याचं प्रशिक्षण देऊन मसाजसेंटर देखील सुरू केले आहे. अंध व्यक्ती अत्यंत कुशलतेने मसाज करतात. 
केंद्रात अंध स्त्री-पुरुषांना मोफत प्रवेश आहे. राहायची, भोजनाची सोय आणि रोजगारप्रशिक्षण दिलं जाते. तिथेच कामही मिळते. सुडे यांनी या ठिकाणी काम करणाऱ्यांचे आंतरजातीय विवाहदेखील लावून दिले आहेत. येथील अंधांना जगण्याचा आत्मविश्वास मिळाला की ते आपापल्या गावी परत जातात आणि सन्मानाने ताठ मानेने जीवन व्यतीत करतात.
सुडे म्हणतात, "स्पर्शज्ञानातून अंधांना स्वावलंबी बनविण्याचं काम करतो. त्यातून अनेक अंध उभे राहिले आहेत. गेल्या ३० वर्षांत हजारो अंध सन्मानजनक अर्थाजन करीत जगणं शिकले आहेत. आता मुलगा प्रशांत या कामात साथ देत आहे".

लेखक: शिवाजी कांबळे, लातूर.

Wednesday, December 7, 2016

नवी उमेद :


...त्याने दिली प्रेरणा


आम्ही सेवक’ या संस्थेच्या माध्यमातून रवी बापटले काम करीत होते. एकदा काही कारणाने ते उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथे गेले. तिथे घडलेल्या एका विचित्र घटनेने अस्वस्थ झाले आणि तिथंच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. गावात एक एचआयव्हीबाधित जोडपे होते. पदरी एक मुलगा. आजाराने मुलाची आई मरण पावली. नंतर या लहानशा मुलालाही एचआयव्हीचा असल्याचे समजले. तेव्हा कुटुंबीयांनी या मुलाला त्याच्या पित्यासह वाळीत टाकले. एका पडक्या खोलीत त्यांची रवानगी झाली. काही काळातच या मुलाचा अन्नपाण्यावाचून मृत्यू झाला. आजाराचा संसर्ग होईल या गैरसमजामुळे त्याच्या मृतदेहाकडे तब्बल तीन दिवस कोणीही लक्ष दिले नाही. हे पाहून बापटले यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या मुलावर अंत्यसंस्कार केले. याच घटनेमुळे बापटले यांच्या मनात ‘सेवालया’चे बीज रूजले. 
हासेगाव ता. औसा जि. लातूर येथे रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय सुरू केले. सध्या या सेवालयात ७१ मुलं आहेत. त्यांच्या या कामाला समाजातून मोठा विरोध झाला. मात्र, त्यांनी खंबीरपणे उभे राहत सरकारी अनुदानाशिवाय हे केंद्र चालविले. स्वत: अविवाहित राहून हा प्रपंच त्यांनी व्यापक केला आहे. अशी अनेक लहान मुले त्यांनी न केलेल्या दोषाची शिक्षा भोगत असतील, अनाथ व बहिष्कृत होऊन जगत असतील या विचाराने एचआयव्हीबाधित मुलांसाठी सेवालयाची स्थापना केल्याचे ते सांगतात. 
बापटले यांनी हासेगावच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. सेवालय उभारून ७१ मुलांचे आईबाप बनून ते संगोपन करीत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी, परदेशी फंड न घेता लोकांच्या दातृत्वावर हे सेवालय चालते. याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शांतेश्वर मुक्ता यांचे आजोबा कै. मन्मथ अप्पा मुक्ता यांनी सेवालयाला साडेसहा एकर जमीन दान केलेली आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी सेवालयाचे पालकत्व स्वीकारले आहे. 
शिकायला मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्कच. पण तो हक्कही इथल्या ग्रामसभेने डावलला होता. शेवटी लातूरमधील पत्रकार व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुलांच्या पाठीशी उभे राहत हसेगावच्या जिल्हापरिषद शाळेत या मुलांना प्रवेश देणे भाग पाडले.
आज एचआयव्हीबद्दलची दहशत काहीशी कमी झाली असली तरी एचआयव्हीबाधित व त्यांच्या मुलांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या मुलांचे मोठे हाल होतात. अशा मुलांना येथे आधार दिला जातो, मायेने सांभाळले जाते, एवढेच नाही तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. 
 चिमुकली मुले लवकरच १८ वर्ष पूर्ण करणार आहेत. आता पुढे काय, या विचारातून अस्वस्थ झालेल्या बापटले यांच्या चिंतनातून ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’चा (एचआयव्ही) चा जन्म झाला. सज्ञान मुलांच्या पुनवर्सनाचा हा देशातील एकमेव प्रकल्प असावा. आर्थिक पायाबांधणीला हीच मुले पुढे सरसावली. स्नेहा शिंदे यांच्या सहकार्यातून मुलांनी 'हैप्पी म्युझिक शो' सुरु केला. आणि त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीतून संस्थेचं बरचसं कामकाज चालतं. मायेचा पदर आणि बापटले यांच्या आश्वासक खांद्यांचा आधार घेऊन हे बाळगोपाळ वाटचाल करीत आहेत.

रवी बापटले यांचा मोबा. क्र. - ९५०३१७७७००

शिवाजी कांबळे - लातूर.

Monday, November 28, 2016

किराणा दुकानेही ओस



लोकांना चलन उपलब्ध होण्याची प्रतीक्षा
 सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारात चिल्लर मिळणे दुरापास्त झाले आहे. चलन तुटवड्याचा परिणाम किराणा व्यापारावरही जवळपास ५० टक्केंपर्यंत झाला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करायच्या? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतील काही किराणा दुकानदारांनी व्यक्त केली आहे. मात्र या निर्णयाच धंद्यालाही फटका बसल्याचे सांगत आहेत.
हजार qकवा पाचशे रुपयांची नोट घेऊन किराणा दुकानात येणाèया ग्राहकांना पूर्ण रकमेचा माल खरेदी करावा लागेल, अशी अट काही किराणा व्यापाèयांकडून घालण्यात येत आहे. त्यामुळे किरकोळ किराणा खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्पच झाली आहे. किराणा धंद्यातही मंदी आली आहे. पैशांअभावी किराणा व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. किरकोळ किराणा दुकानदारांकडून ठोक व्यापारी हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्विकारीत नसल्याने किरकोळ व्यापाèयांनी देखील ग्राहकांकडून या अधिक किमतीच्या नोटा घेणे बंद केले आहे. त्यामुळे छोटे व्यापाèयांनी दुकानात माल आणणे बंद केले आहे.

चांगल्या निर्णयासाठी त्रास होणारच : अभिजित खंदाडे
 मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चांगला आहे. चांगल्या निर्णयासाठी अडचणी तर येणारच आहेत. सध्या मोठ्या नोटा बाजारपेठेत कोणीच स्वीकारीत नाहीत. आम्हीही नाही. आमच्या व्यवसायावर ३० च्या आसपास  परिणाम झाला आहे. ग्राहकाने पाठ फिरविली आहे, कारण त्यांच्याकडेही पैसे नाहीत. सगळीकडे चिल्लरचे वांदे आहे. असे मत औसा रोडवरील प्रीती किराणाचे मालक अभिजित खंदाडे यांनी व्यक्त केले.

चिल्लर असेल तरच माल : सुनील बोमणे
नोटाबंदीमुळे व्यावहारात चिल्लरची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या किराणा दुकानाच्या व्यापारावर ५० टक्के परिणाम झाला आहे. धंदा मंदावला आहे. चिल्लर असेल तरच आम्ही किराणा माल देत आहोत. आमच्याकडून मोठे व्यापारी  हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारीत नाहीत, त्यामुळे आम्ही त्या नोटा स्वीकारीत नाहीत. अशी प्रतिक्रिया बार्शी रोड, येथील शिव प्रोव्हीजनचे सुनील बोमणे यांनी व्यक्त केली.

ग्राहकांची संख्या रोडावली : तुकाराम कदम
पैसे बदलून घेण्यासाठी बँकेसमोर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय मोठ्या नोटा ठोक व्यापारीही घेईनासे झालेत. त्यामुळे हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद केले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेची चिल्लर शक्य नाही. त्यामुळे धंदा खूप कमी होत आहे. मात्र मोदी सरकारचा निर्णय काळा पैसेवाल्यांना आळा घालण्यासाठी चांगला आहे. अशी प्रतिक्रिया पाच नंबर चौकातील नृqसह प्रोव्हीजन आणि जनरल स्टोअर्सचे तुकाराम कदम यांनी दिली.

............................................



स्टील मार्केटमधील
उलाढाल थांबली : राजेंद्र खटोड
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम लातूरच्या स्टील मार्केटवरही झाला आहे. स्टील मार्केट जवळपास थंडच आहे. चलन तुटवड्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्टीलचा व्यवसायाचे बहुतांशी नुकसान झाले. मात्र सरकारचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचा थांबविण्यासाठी चांगला आहे. लोकांना महिनाभर कळ सोसावी लागणार आहे. त्यानंतर नेहमीसारखे सुरूळीत व्यवहार होतील. अशी प्रतिक्रिया मार्केट यार्डातील प्रिन्स स्टीलचे ठोक विक्रेते राजेंद्र खटोड यांनी एकमतशी बोलताना दिली.

दागिण्यांसाठी धनादेशही
 स्वीकारतो : विश्वनाथ किनीकर
सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे. अशातच नोटाबंदीचा निर्णय झाल्यामुळे लग्न समारंभ ज्यांच्या घरी आहे, त्यांची मोठी अडचण झाली आहे. ज्या लोकांना लग्नासाठी दागिणे अत्यावश्यक आहेत, अशा लोकांकडून आम्ही धनादेश आणि आरपीजीएसच्या माध्यमातून पेमेंट घेत आहोत. सराफा बाजारात चलनच उपलब्ध नसल्यामुळे बाजारपेठ थंडावली आहे. नवीन चलन हातात येईपर्यंत लोकांना त्रास सहन करावा तर लागणार हे निश्चित. सोन्या -चादींच्या व्यापारावर सुमारे ५० टक्के  परिणाम झाला आहे. अशी प्रतिक्रिया लातूरच्या सराफा पेठेतील सराफा व्यापारी विश्वनाथ किनीकर यांनी व्यक्त केली आहे.
...........................................................

नोटाबंदीने पान-सुपारीला ‘चुनाङ्क
टपरीधारक म्हणतात, उधार द्यावं लागतं
पान-सुपारी, सिगरेट, बिडी, पान मसाला, तंबाखू या गोष्टी आरोग्याला हानीकारक असल्या तरी दैनंदिन गरज बनलेल्या आहेत. अनेकांना या गोष्टी मिळाल्या नाही तर त्यांना अस्वस्थ  व्हायला लागते. बहुतांशी लोकांना लागलेल्या व्यसनामुळे शहरातील टपरीधारकांचा व्यवसाय चालतो. लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. एका एका टपरीचा व्यवसाय  दिवसाकाठी ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंतचा होतो. मात्र पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबरला हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून टपरीधारकांना गेल्या १३ दिवसांत मोठा आर्थिक फटका बसला आहे.
चिल्लर अभावी ग्राहकांनी टपरींकडे पाठ फिरविल्याचे चित्र लातूर शहरात दिसून येत आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारात कोणीच स्वीकारीत नाहीत. आणि नव्या नोटा बाजारात उपलब्ध नाहीत. दोन हजार रुपयांची नोट काही प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे. पण त्याचे चिल्लर कसे आणि कोण देणार, हा मोठा गहन प्रश्न व्यापारी आणि ग्राहकांसमोरही आहे. त्यामुळे अनेकवेळा टपरीवर आलेल्या ग्राहकांना उधारी पान, सुपारी द्यावी लागते qकवा ग्राहकांकडील नोट ठेवून घेऊन त्यातूनच त्या ग्राहकाला रोज पान-सुपारी दिली जाते. चिल्लरअभावी या व्यावसायाचेही वांदे झाले आहे. सरकारने लवकरात लवकर चलन उपलब्ध करून लोकांचा त्रास थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोन हजाराची नोट कशी
स्वीकारणार ? : राम काळे
 सरकारने चलनातून बाद ठरविलेल्या नोटा घेणे तर आम्ही केव्हाच बंद केले आहे. सुरूवातीला लोक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन टपरीवर यायचे आणि १० रुपयांची सुपारी मागायचे. पण चिल्लरच नसल्याने पान, सुपारी ग्राहकांना देणे शक्य नाही. काही नियमित आणि ओळखीच्या ग्राहकांना उधार द्यावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत चिल्लर बाजारात आणि व्यवहारात उपलब्ध नसल्याने टपरीच्या व्यवसायात  बèयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. बरेचजण २ हजाराची नोट घेऊन येतात, या नोटेचे करायचे काय, चिल्लर कुठून आणायची, हा मोठा प्रश्न ग्राहक आणि आमच्यासमोरचा आहे. अशी प्रतिक्रिया पीव्हीआर थिऐटर जवळील अभिजीत पान सेंटरचे राम काळे यांनी दिली आहे.

ग्राहक कमी झाले : किशोर सुरवसे
 जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्या. आम्हीही स्वीकारणे बंद केले. तरी देखील अनेकजण या नोटा घेऊन सुपारी खाण्यासाठी टपरीवर येतात.किंवा नवीन २ हजार रुपयांची नोट घेऊन येतात. त्यात काही ओळखीचे व नियमित ग्राहक असतात. मग त्यांना उधारी सुपारी, पान द्यावे लागते.  चलन पुढे जात नसल्यामुळे टपरीवरील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ज्या पीव्हीआर सिनेमा थिएटरसमोर आमची टपरी आहे, त्या थिएटरचा धंदा चलन तुटवड्याने ठप्प झाल्याने टपरीवर ग्राहक तुरळक येत आहेत. सरकारने लवकर चलनात कमी qकमतीच्या नव्या नोटा आणाव्यात आणि हेळसांड थांबवावी. असे मत पीव्हीआर सिनेमा थिएटरसमोरील न्यू स्वप्नलोक पान शॉपचे किशोर सुरवसे यांनी व्यक्त केले.

७५ टक्के टपरी मार्केट थंड : शेख इमामसाब
नोटाबंदीमुळे आमच्या टपरीवाल्यांचा धंदा ७५ टक्के थंड पडला आहे. याचं कारणे म्हणजे मार्केटमध्ये चिल्लरच नाही. दिवसभराचा धंदा २०० रुपये देखील होण्याची मारामार आहे.चिल्लर घेऊन येणाèया ग्राहकांची वाट पाहात बसावे लागते. अशी प्रतिक्रिया टाउन हॉल, मैदान, मेन रोडवरील टपरीचालक शेख इमामसाब यांनी दिली.

चिल्लरची समस्या कायम : संतोष मानकर
 हजार आणि पाचशे तर सोडाच इथे शंभर रुपयांचेही चिल्लर उपलब्ध नाही. ग्राहकांना कुठून चिल्लर द्यायची, ज्या ग्राहकांकडे चिल्लर आहे, तेच ग्राहक चहा पिण्यासाठी आमच्या हॉटेलात येत आहेत. त्यामुळे चहा पिण्याची इच्छा असूनही अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. खरे तर या चार महिन्यात लोक चहा जास्त पितात. मात्र नोटाबंदीनंतर गेल्या १३-१४ दिवसांपासून चहाचा धंदा थंड झाला आहे. ग्राहकअभावी हॉटेलवर बसून राहावे लागते. अशी प्रतिक्रिया  पाच नंबर चौकातील रेल्वे स्टेशन रोडवरील राधिका हॉटेलचे चालक संतोष मानकर यांनी व्यक्त केली.

Thursday, November 24, 2016

बाजारपेठ मंदावली

बाजारपेठ मंदावली
चलन तुटवड्याने सामान्यांचे हाल
९० टक्के दैनंदिन व्यवहार ठप्प
लातूर : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजच्या व्यवहारासाठी बँकांतून पैसे काढण्यासाठी सर्वसामान्यांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. पैशांचा खडखडाट असल्याने अनेक एटीएम मशिनही बंद आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी ९० टक्के बाजारपेठ ठप्प झाली आहे. एक तर जुन्या नोटा बाजारात घेणे बंद झाले आहे, तर दुसरीकडे नव्याने बाजारात आलेल्या २००० रुपयांच्या नोटेचे चिल्लर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली असून, यातून व्यवहारावर विपरित परिणाम झाला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाने चलन तुटवडा झाल्याने लातूर शहरातील बाजारपेठेत अक्षरशः शुकशुकाट दिसून येत आहे. ग्राहकच फिरकत नसल्याने अनेकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. नोटाबंदीने पैशाचे व्यवहारच थंडावले असून, लोकांकडे चलन राहिले नाही आणि २ हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध असूनही दुकानदारांनी त्याचे चिल्लर कुठून द्यायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हिरव्या पालेभाज्यांच्या बाजाराचीही बिकट अवस्था झाली आहे. लोकांकडे सुटे पैसे नसल्याने भाजीपाला बाजारात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. अनेक भाजी विक्रेत्यांना आपला भाजीपाला सडून जात असल्याने तो फेकून देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिला नाही.
याशिवाय औषध विक्रेते, किराणा भुसार व्यापारी, ऑटो रिक्षा, स्वेटर विक्रेते, जनरल स्टोअर्स, सराफा व्यापारी, भांड्यांची दुकाने, रॅस्टॉरंट, बांधकाम साहित्य विक्रेते, फळ विक्रेते आदी प्रकारचे सर्व व्यापारी चलन तुटवड्यामुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. नोटाबंंदीचा सर्वांत विपरित परिणाम सर्वसामान्यांवर झाला आहे. जवळ चिल्लर नाही आणि २ हजार रुपयाची नोट घेऊन बाजारभर फिरले तरी त्याची चिल्लर कुणाकडेच उपलब्ध नाही qकवा कोणी देत नाही. अशा परिस्थितीत करायचे तरी काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने ५०, १००, ५०० रुपयांचे चलन लवकर सर्वत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहक व व्यापारी वर्गातून केली जात आहे.

आधी दुष्काळ आता व्यापार बंद : प्रदीप सोळंकी
दुष्काळामुळे त्रस्त असलेली लातूरची जनतेला पावसाळाअखेर पावसाने दिलासा दिला होता. बाजार सुधारण्याच्या स्थितीत असतानाच मोदी सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. यामुळे लातूरची बाजारपेठ पूर्णत: थंडावली आहे. लोकांचा नोटा बदलण्यासाठी बँकांसमोरील रांगेतच वेळ गेला. यामुळे शेतकरीही यामध्येच अडकले त्यामुळे बाजारपेठेत मंदी निर्माण झाली. रिटेल व्यापाèयांनीही  हजार, पाचशे रुपयांच्या नोटा घेणे बंद केल्याने सर्व चक्रच बंद पडले. जवळपास ९० टक्के  बाजारपेठ ठप्पच झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत ग्राहक बाजारात राहणारच नाही. पैसे खर्चाची मानसिकता आता लोकांमध्ये बदलू लागली आहे. लोकांना बचतीची सवयही लागेल. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे. या निर्णयामुळे आता खèया अर्थाने समाजवाद येईल. सामान्य लोकांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोळंकी यांनी एकमतशी बोलताना व्यक्त केली.

सोन्या-चांदीची खरेदी-विक्री थांबली : विजय सूर्यवंशी
नोटाबंदीमुळे सध्या सराफा बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात चलन तुटवड्याचा परिणाम झाला आहे. जवळपास ९५ टक्के खरेदी -विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत. साधारणपणे फक्त ५ टक्के व्यवहार सुरू असून ९५ टक्के बाजारपेठ ठप्प झाली आहे. सोनेविक्री करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना देण्यासाठी चिल्लर  नसल्याने खरेदीही बंद झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाआधी लातूरच्या सराफा बाजारपेठेत दररोज २० ते २५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असे. आता मात्र दिवसाला ५ लाख रुपयांचाही व्यवहार होत नाही, अशी प्रतिक्रिया लातूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजयराव सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सगळीकडून आर्थिक कोंडी : प्रमोद साळुंखे
नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास गरिबांनाच आधिक होत आहे. आधी दुष्काळाचा आणि आता नोटाबंदीचा फटका यामुळे सामान्य लोक हैराण झाले आहेत. गेल्या ९ नोव्हेंबरपासून आमच्या रेस्टॉरंटचा  व्यवसाय ७० टक्के  थंडावला आहे. हजार व पाचशेच्या नोटा आमच्यासह बाजारात कोणीच स्वीकारत नाहीत. २ हजारची नोट चलनात आहे; पण त्याचे चिल्लर मिळत नाही. सामान्यांची सगळीकडूनच आर्थिक कोंडी होत आहे त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे, असे मत पीव्हीआर चौकातील आनंद रेस्टॉरंटचे मालक प्रमोद साळुंखे यांनी व्यक्त केले.

लग्नसराईत भांडी खरेदी नाही : रामेश्वर पुनपाळे
नोटाबंदीमुळे ऐन लग्नसराईत भांडी खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला मोठा फटका बसला आहे. लग्नकार्यात लोक अल्युमिनीयमची भांडी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात पण भांडीविक्रीचा सुमारे ७० टक्के व्यवहार कोलमडला आहे. पहिल्यासारखा व्यवहार सुरू होण्यासाठी साधारणपणे आणखी दोन महिने लागतील. चलन तुटवड्यामुळे धंदाच मंदावला आहे. सरकारने कोणत्याही प्रकारचा होमवर्क न करता हा नोटाबंदीचा निर्णय लादला आहे. बाजाराचे अर्थचक्रच बिघडले आहे. कामगारांचे पगार करण्यासाठीदेखील पैशांची चणचण निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया सुयोग मेटल इंडस्ट्रिजचे संचालक रामेश्वर पुनपाळे यांनी एकमतशी बोलताना दिली.
-----------------------

औषधविक्रेत्यांकडेही चलन तुटवडा
काही विक्रेते स्वीकारताहेत धनादेश
तर काही जणांना हवे चिल्लरच
चलनातून रद्द ठरविण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा औषध विक्रेते आणि खाजगी रुग्णालयांनी २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकाराव्यात. असे शासनाने आदेश आहेत. चलन तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारने खाजगी रुग्णालय आणि औषधविक्रेत्यांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. तसेच चलनाच तुटवडा त्यांनाही जाणवला तर त्यांनी धनादेश स्वीकारावेत, असे निर्देश देखील शासनाने दिले आहेत. मात्र लातूर शहरातील काही औषध विक्रेते शासनाच्या या निर्देशाचे पालन करताना दिसतात तर काहीजण हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होताना दिसत आहे.
तसे पाहिले चलन तुटवड्यामुळे रुगांसोबतच औषध विक्रेते आणि डॉक्टरांची अडचण निर्माण झाली आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारून ग्राहकांना चिल्लर पैसे कुठून द्यायचे, हा प्रश्न गंभीर आहे. तर ग्राहकांकडे हजार, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांशिवाय चिल्लर नसल्याने ग्राहक अडचणीमध्ये आले आहेत. एकंदर विचार केला तर सगळ्यांचीच हेळसांड होत आहे. अनेक औषधविक्रेत्यांचे म्हणणे आहे की, मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय लांबच्या काळासाठी चांगला आहे. काही दिवस आम्हाला  आणि ग्राहकांना त्रास तर होणारच आहे.

अडचण आहे, पण निर्णय चांगला : रामदास भोसले
शासनाने औषधविक्रेत्यांना जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली आहे. तरीदेखील ग्राहकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. आम्ही नियमित ग्राहक असेल तर त्यांना औषधे उधारीवर पण देत आहोत. चलन तुटवड्यामुळे लोकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे अनेकवेळा चिल्लरसाठी वादाचे प्रसंगही दुकानावर उद्भवत आहेत. लोकांच्या अडचणी असल्या तरी देशाचा विचार केला तर मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया शहरातील  अशोक चौकातील औषध विक्रेते रामदास भोसले यांनी दिली आहे.

जुन्या नोटा स्वीकारल्या जातात : रमाकांत गंजेवार
 आम्ही ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा  रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून स्वीकारत आहोत. रुग्णांसाठी आम्ही औषधी देत आहोत. चिल्लरची अडचण निर्माण होते, पण शासनाने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली आहे. काही दिवस अडचण असली तरी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याचे मत शहरातील मेन रोड, टिळकनगर येथील गंजेवार मेडिकल दुकानचे संचालक रमाकांत गंजेवार यांनी ‘एकमत बोलताना व्यक्त केले.

रुग्णांकडून धनादेशही स्वीकारला
 जातो : अविनाश अंबेकर
येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत शासन आदेशानुसार आम्ही रुग्णांना औषध विक्रीसाठी हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारत आहोत. या शिवाय नोटांची अडचण निर्माण झाल्यास आम्ही रुग्णांकडून धनादेशाने देखील रक्कम स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया मेन रोड, लातूर येथील शांप्रद मेडिकल दुकानचे मालक अविनाश अंबेकर यांनी व्यक्त केली आहे. सरकारने ५०,१०० आणि ५०० रुपयांच्या अधिक नोटा चलनात आणल्यास सामान्य लोकांची गैरसोय थांबेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया............


चिल्लरची अडचण आली नाही : शेख अफसर
गांधी हॉस्पिटलमध्ये लिव्हरच्या आजारावर उपचार घेत असलेले विष्णू बालेकर यांचे निकटवर्तीय शेख अफसर म्हणाले, की औषधी खरेदीसाठी मेडिकलच्या दुकानावर अजून तरी काही अडचण आली नाही. मेडिकल दुकानात हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. चिल्लरही देत आहेत.

दोन हजारांचे चिल्लर दिले : डी. पी. घोडके
 मी माझ्यासाठी बीपीच्या गोळ्या आणि पत्नीसाठी औषधी  गांधी चौकातील बालाजी मेडिकलमधून खरेदी केले. दुकानदारास २००० रुपयांची नवी नोट दिली. २०० रुपयांचे बिल झाले. तरी देखील १८०० रुपयांचे चिल्लर दुकानदाराने दिल्याचे मुरूड येथील नागरिक डी.पी. घोडके यांनी सांगितले.
...........................................................

ऑटोरिक्षाचा धंदाही
३० टक्क्यांनी मंदावला
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा फटका ऑटोरिक्षा चालकांनाही बसत आहे. चलन तुटवड्याचा परिणाम ऑटोचालक-मालकांच्या मिळकतीवर झाला आहे. लातूर शहरात ऑटोरिक्षांवर हजारो गोरगरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मोदी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे ९ नोव्हेंबरपासून ऑटोरिक्षाचा व्यवसायही मंदावला आहे.
या नोटाबंदीच्या निर्णयाआधी ऑटोचालकांना दिवसाला ८०० ते १००० रुपयांची कमाई होत होती. आता गेल्या दहा दिवसांपासून दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमाई होत आहे. ५००,१००० आणि दोन हजारांच्या नोटा ऑटोचालक स्वीकारत तर नाहीतच मात्र ग्राहकही ऑटोलचालकांना या मोठ्या नोटा न देण्याचे शहाणपण दाखवित आहेत. केवळ चिल्लर ५ रुपये, १० आणि १५ रुपयांसह १०० रुपयांपर्यंतचे या व्यवसायात व्यवहार होताना दिसत आहेत. मात्र कमी qकमतीच्या चलन तुटवड्यामुळे ऑटोरिक्षा व्यवसायाला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे ऑटोरिक्षाचालक सांगत आहेत.
तसेच मिळालेल्या मिळकतीतून पेट्रोलसाठी किमान ३०० रुपये खर्च करावे लागतात. ऑटोचालक पाचशे qकवा दोन हजार रुपयांची नोट घेऊन पेट्रोलपंपावर गेल्यास त्यांना चिल्लर मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी वादाचे प्रसंगही निर्माण होत असतात.

पेट्रोलला महाग झालो आहोत : अशोक qचदे
नोटाबंदी झाल्यामुळे व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे. चिल्लर पैसे देण्यासाठी ग्राहक का कू करीत आहेत. अनेकवेळा मोठी नोट दाखवून चिल्लर आहे का, अशी विचारणा करतात. आधी दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मिळायचे. पण १०० रुपयेही कमाई होत नाही. पेट्रोलला महाग होत आहोत, अशी प्रतिक्रिया पाच नंबर चौक ते गंजगोलाईपर्यंत ऑटोने प्रवाशी वाहतूक करणारे ऑटोचालक अशोक qचदे यांनी व्यक्त केली आहे.

जगणे कठीण झालेय : तुकारात थोरात
 लोकांकडे चिल्लर उपलब्ध नसल्यामुळे आमचा ऑटोचा धंदा चांगलाच मार खालाय. मला याआधी रोज ४०० ते ५०० रुपये मिळायचे. आता तेलाचा खर्च वजा जाता केवळ २०० रुपये हातात येतात. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह, गाडीचे मेंटेन्स कसे करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. मी भाड्याने ऑटो घेऊन चालवितो, भाडे देण्याचा ताणही वाढला आहे, अशी प्रतिक्रिया ऑटोचालक तुकारात थोरात या युवकाने व्यक्त केली.

त्रास आहे, पण सरकारचा निर्णय चांगला : गणपती कांबळे
नोटाबंदीमुळे ऑटोरिक्षाचा धंदा मंदावला आहे. २५ ते ३० टक्के धंद्याला फटका बसला आहे. पण हे काही दिवसच त्रास सहन करावा लागेल. सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ‘नंबर एकचाङ्क आहे. कारण या निर्णयाने गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होईल, असे मत ऑटोचालक गणपती कांबळे यांनी ‘एकमतङ्कशी बोलताना व्यक्त केले.

 ग्राहक सहसा ५०० ची नोट
काढत नाही : संजय जंगापल्ले
 माझा ऑटोचा धंदा पूर्वी ९०० ते १००० रुपयांपर्यंत व्हायचा. पण आता चिल्लरची चणचण सगळ्यांनाच भासत असल्याने धंद्यावर परिणाम झाला आहे. आता ६०० ते ७०० रुपये दिवसाकाठी धंदा होतो आहे. सहसा पाचशे रुपयांची नोट ग्राहक काढत नाही. आमचा धंदा चिल्लरवर चालतो, अशी प्रतिक्रिया ऑटोचालक संजय जंगापल्ले यांनी व्यक्त केली.

Tuesday, May 5, 2015

बिनबोभाट भ्रष्टाचार !



.....................................
वैद्यकीय आणि इतर व्यावसायकि शिक्षणासाठी भरमसाठ फी आणि डोनेशन घेऊन शिक्षणाचा बाजार मांडणा-या शिक्षण सम्राटांवर कायद्याचा अंकुश ठेवण्याचा, विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक हिताचे कायदेशीर रक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयामुळे खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्याथ्र्यांची लूटमार करण्याची मक्तेदारी संपुष्टात येण्यास मदत होईल. पण हा नवा कायदा राज्यातील अभिमत(डीम्ड) विद्यापीठांना लागू होणार नाही. त्यामुळे १४२५ जागांसाठी या विद्यापीठांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळे होईल. अभिमत विद्यापीठांना वेगळा न्याय का? या अभिमत विद्यापीठांमध्ये सरकारच्या नियंत्रणाखाली सामायीक प्रवेश परीक्षा (सीईटी) का घेतली जाऊ नये ? याबाबतचा सरकारने गंभीरपणे विचार करायला हवा.
.......................................................
गरीब, होतकरू विद्याथ्र्यांना वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण सुलभपणे आणि अल्पदरात मिळावे , या हेतूने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कारकिर्दीत विना अनुदानित उच्च शिक्षणाची सोय खाजगी क्षेत्रात उपलब्ध झाली. कालांतराने मात्र शिक्षण संस्थाचालकांनी हे उच्च शिक्षण धंदेवाईक करून टाकले. विनाअनुदानित तत्वाच्या उदार धोरणालाच सुरुंग लावण्याचे काम काही शिक्षण सम्राटांकडून होऊ लागले. विद्याथ्र्यांकडून लाखो रुपयांची फी उकळून आपल्या तुंबड्या भरता येतात, याच हेतून राज्यात अनेक शिक्षण संस्था झपाट्याने वाढू लागल्या. खाजगी उच्च शिक्षण क्षेत्रातही धंदेवाईकपणा आला. त्यामुळे उच्च शिक्षण महागडे झाले. गरीबांना उच्च शिक्षण नाकारणारी व्यवस्था निर्माण होऊ लागली. श्रीमंत वर्गाची मिरासदारी  या शिक्षण क्षेत्रात निर्माण होत आहे. भांडवलदारांना शिक्षणात नफेखोरी करण्याची संधी दिली गेल्यामुळेच बहुजन, गरीब आणि होतकरू विद्यार्थी वैद्यकीय qकवा तांत्रिक उच्च शिक्षणापासनू वंचित राहू लागले. आणि याचे सरकारला काही सोयरसूतक नाही.
 वैद्यकीय शिक्षणाचा तर पार पचका होऊन बसला आहे. खाजगी विनाअनुदानित आणि अभिमत(डीम्ड) विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी  विद्यार्थी, पालकांकडून लाखो रुपयांची लूट बिनबोभाट केली जात आहे. या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांवर सरकारचे कोणतीही बंधने नसल्यामुळे ते विद्याथ्र्यांकडून मनमानी फी उकळू लागले. वेगवेगळ्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा राजरोसपणे सुरू झाला. या शिक्षण संस्था स्वत:च्या सीईटी परीक्षा घेऊन कोट्यवधी रुपयांची लूट करू लागल्या. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तर ‘ बोला किती देता?ङ्क अशा पद्धतीने निव्वळ खोèयाने पैसा लुबाडण्याचे काम सुरू आहे. आज जे खाजगी  आणि अभिमत विद्यापीठे आहेत, ती सर्वसामान्य विद्याथ्र्यांना परवडणारी नसतील तर सरकार ही विद्यापीठे का चालवू देत आहे? हा आजचा कळीचा प्रश्न आहे. राज्यात आजमितीला एकूण ४३ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात राज्य शासनाची १४, केंद्र शासनाची २ आणि महापालिकांची ४  आहेत. विनाअनुदानित तत्वावरील ११ तर अभिमत विद्यापीठाची १० वैद्यकीय महाविद्यालये आहेत.  या सर्व मिळून साधारणपणे एकूण ५,१९५ जागा आहेत. त्यापैकी अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा १४२५ इतक्या आहेत.
 गल्लाभरू शिक्षण सम्राटांना वेसन
वैद्यकीय आणि इतर व्यावसायकि शिक्षणासाठी भरमसाठ फी आणि डोनेशन घेऊन शिक्षणाचा बाजार मांडणाèया गल्लाभरू शिक्षण सम्राटांवर कायद्याचा अंकुश ठेवण्याचा, विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक हिताचे कायदेशीर रक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २१ एप्रिल रोजी घेतला. या निर्णयामुळे खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाèया विद्याथ्र्यांची लूटमार करण्याची मक्तेदारी संपण्यास मदत होईल. शिक्षण शुल्क आणि प्रवेश नियंत्रणाचा नवा कायदा आस्तिवात आल्यानंतर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सरकारच्या नियंत्रणाखाली सामायीक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) घेण्यात येणार आहे. शिवाय हा कायदा धाब्यावर बसविणाèया संस्थाचालकांना सहा ते दोन वर्षांपर्यतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद देखील या कायद्यात आहे.एवढेच नाही तर विद्याथ्र्यांकडून जास्तीची फी वसूली केल्याचे आढळल्यास  ती फी देखील परत करावी लागणार आहे. त्यामुळे धंदेवाईक शिक्षण सम्राटांना या कायद्याचा चांगलाच चाप बसणार आहे. जनसामान्यांची अपेक्षा एवढीच आहे की, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बाजारू वृत्तीला काही प्रमाणात का असेना  या नव्या कायद्याने रोख बसेल. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे २००० विद्याथ्र्यांना सामायीक प्रवेश परीक्षा अर्थात एमच-सीईटी या वैद्यकीय संचालकांकडून घेतल्या जाणाèया गुणानुक्रमानुसार प्रवेश देण्यात येतात. आता पुढील वर्षांपासून खाजगी असोसिएट वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश देखील एमएच-सीईटी या परीक्षेतील गुणानुक्रमानुसारच देण्यात येतील. त्यामुळे राज्यातील शेकडो होतकरू आणि गुणवंत विद्याथ्र्यांना  याचा फायदा होणार आहे. साधारणपणे  या निर्णयामुळे खाजगी असोसिएट वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६०० पैकी ५१० विद्याथ्र्यांना फायदा होईल.
‘अभिमतङ्क ला वेगळा न्याय का?
शुल्क व प्रवेश नियंत्रणाचा निर्णय घेताना  मात्र सरकारने एक ग्यानबाची मेख मारून ठेवली आहे. शुल्क व प्रवेश नियंत्रणाचा  हा नवा कायदा राज्यातील अभिमत आणि स्वायत्त विद्यापीठांना लागू होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या १४२५ जागांसाठी भ्रष्टाचाराचे रान मोकळे ठेवण्याची सोयीस्कर व्यवस्थाच जणू सरकारने करून ठेवलेली आहे, असेच म्हणावे लागेल.  महाराष्ट्रातील पुण्याचे भारती विद्यापीठ,  कोल्हापुरचे डी.वाय. पाटील, कराडचे कृष्णा, औरंगाबादचे  एमजीएम, लोणीचे प्रवरा अशा पाच अभिमत विद्यापीठाची दहा वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांतील वैद्यकीय शिक्षणक्रमाच्या १४२५ जागांवरील प्रवेश मात्र सामायीक प्रवेश परीक्षेतून घेतले जाणार नाहीत. हा निर्णय  अत्यंत खेदाचा आणि गरीब, होतकरू विद्याथ्र्यांवर अन्यायकारक असा आहे. सर्व खाजगी वैयक्तिक प्रवेशासाठी १५ टक्क्े व्यवस्थापन कोटा असतो, त्यासाठी डोनेशन घेतले जातेच. पण ८५ टक्के जागांसाठी देखील वार्षिक फी  सुमारे ५ लाख रुपये आकारली जाते. अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयांत ८५ टक्के प्रवेश एमएच-सीईटी गुणांनुसार दिल्यास फी भरून का असेना काही होतकरू विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतील. त्यामुळे राज्यातील सरसगट वैद्यकीय  महाविद्यालयात एमएच-सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश द्यायला हवेत. गरीब, होतकरू विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा बळी देऊन सरकार कुणाचे हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे? अभिमत विद्यापीठांना वेगळा न्याय का? या अभिमत विद्यापीठांमध्ये सरकारच्या नियंत्रणाखाली सामायीक प्रवेश परीक्षा (सीईटी) का घेतली जाऊ नये ? याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे.
या संदर्भात नांदेडचे श्री माणिकप्रभू शिक्षण आणि आरोग्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम तेलंगसह अन्य काही शिक्षण तज्ज्ञांनी देखील राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदने पाठविलेली आहेत.
अधिकारांचा गैरफायदा
विद्यापीठ अनुदान आयोग १९५६ च्या कलम ३ नुसार केंद्र सरकारने अभिमत विद्यापीठ म्हणून काही संस्था घोषित केल्या. त्यानंतर अनेक पुढाèयांनी अभिमत विद्यापीठाच्या नावाखाली राज्यात स्वत:ची संस्थाने उभी केली आणि त्यातूनच मनमानी कारभाराला सुरूवात झाली. या अभिमत विद्यापीठांना स्वत:चा अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार, शिवाय प्रवेश प्रक्रिया, शुल्क तसेच विद्यार्थी आणि शिक्षण यांचे स्वतंत्र नियम तयार करण्याचे अधिकारही मिळतात. ज्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात ही अभिमत विद्यापीठे येतात त्यांनाही यांच्या कारभारात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे या विद्यापीठांत गैरप्रकार वाढू लागला.  भरमसाठ प्रवेश शुल्क, शिवाय  इतर देणग्या, चुकीची प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांच्या प्राथमिक अधिकारांची पायमल्ली यामुळे अशा विद्यापीठांचा दर्जा घसरत गेला आणि भ्रष्टाचार वाढत गेला. १५ टक्के खाजगी वैयक्तिक कोट्यामध्ये विद्यार्थी पालकांकडून लाखोंची लूट तर केली जातेच. पण ८५ टक्के जागांसाठीही निर्धारित फी पेक्षा मनमानी फी आकारली जाते. अभिमत विद्यापीठांनी गैरकारभार सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने सरकारने पाच वर्षांपूर्वी पी.एन. टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवून याची चौकशी केली. त्या समितीने  संबंधित सर्व विद्यापीठांना भेटी देऊन त्यांची तपासणी केली आणि विद्यापीठांच्या चुका, गैरव्यावहार सरकारसमोर मांडले. पण पुढे झाले काहीच नाही. अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बेकायदेशीर  आणि गुणवता डावलून केवळ पैशांच्या मोहापायी प्रवेशांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे?  सरकार या बाबत काहीच उत्तरदायी नाही का? असे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून अनुत्तरीतच आहेत.
 बारावी विज्ञान शाखेतील उत्र्तीण होणाèया विद्याथ्र्यांना गुणानूक्रमे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची पद्धत शासकीय पातळीवर राबविली जाते. आता उद्याच्या ७ मे रोजी सीईटीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात राज्य सरकारने अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८५ टक्के प्रवेशाबाबत सरकारने सामायीक परीक्षा घेण्याचा विचार गंभीरपणे करायला हवा. शिवाय प्रवेश आणि शुल्क नियंत्रण कायदा अभिमत विद्यापीठांना लागू करण्याबाबतही विचार केल्यास महाराष्ट्रातील शेकडो होतकरू मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होऊ शकेल.

                                                                                                 - शिवाजी कांबळे
                                                                                                    ९०११३०८५८०

Translate